सांगली

नांद्रेत सख्ख्या भावाचा निर्घृण खून

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून नांद्रे (ता. मिरज) येथे दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय 30) याचा धारदार हत्याराने वार व काठीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी संशयित राहुल ऊर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (32) याला अटक करण्यात आली आहे.

कुंभार बंधू सेंट्रिंगचे काम करतात. दोघांना दारूचे व्यसन होते. संशयित राहुलची पत्नी सहा वर्षापूर्वी त्याला सोडून गेली आहे. नांद्रेतील कुंभार गल्लीत दोघेही आई, वडिलांसोबत राहतात. दोघेही दररोज दारू पिऊन घरी यायचे. घरखर्चाला पैसे देण्यावरून त्यांच्यात वाद होत असे. या वादातून कंटाळून त्यांच्या आई, वडिलांनी दोन महिन्यापूर्वी घर सोडले. ते गावात भाड्याने राहतात.

गुरुवारी रात्री दत्तात्रय दारू पिऊन घरी आला. संशयित राहुलने त्याला 'तुला दारू प्यायला पैसे आहेत, घरखर्चाला का देत नाहीस', असा जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. राहुलने दत्तात्रयच्या डोक्यात काठीने मारहाण केली. तसेच धारदार हत्यार घेऊन वार केले.

उपचार करण्यास हलविले, पण…

दोघांत सुरू असलेल्या वादाचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी दत्तात्रयला उपचारार्थ हलविले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक शिवाजी गायकवाड, हवालदार संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्यासाठी वापरलेले हत्यार व काठी जप्त केली आहे. याप्रकरणी मृत दत्तात्रयचे वडील प्रकाश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT