Commissioner Shubham Gupta taking information about the X-ray machine at the Central Diagnostic Center of the Municipal Corporation.
सांगली : महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रातील एक्स-रे मशीनची माहिती घेताना आयुक्त शुभम गुप्ता. Pudhari Photo
सांगली

सांगली : मनपाच्या निदान केंद्राचे रिपोर्ट लवकरच मोबाईलवर

पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रातून विविध चाचण्यांचे रिपोर्ट लवकरच रुग्णांना मोबाईलवर मिळतील. रुग्णांचा हेलपाटा वाचेल. अत्याधुनिक सेवा, सुविधांचा लाभ दिला जाईल. स्वस्त औषधांसाठी याठिकाणी जेनेरिक मेडिकल सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

आयुक्त गुप्ता यांनी गुरुवारी महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राला भेट दिली. निदान केंद्र तसेच महालॅबकडून मोफत केल्या जाणार्‍या तपासण्या, अल्पदरातील रक्तचाचणी यांची माहिती घेतली. चाचण्यांसाठी वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या मशिनरींची पाहणी केली. महालॅबकडून सध्या संगणकीय कामकाज क्लाऊड प्रणालीद्वारे चालू केले जात आहे. त्याची पाहणी केली.

महापालिका क्षेत्रातील गरजू रुग्णांना आधुनिक आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी मशिनरी आणि तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कमी वेळेत अधिक बिनचूक रिपोर्टसाठी अत्याधुनिक एक्स-रे मशीन खरेदी केले जाणार आहे. आरोग्य तपासणीसाठी अन्य मशिनरीही उपलब्ध केल्या जाणार आहेत. क्लाऊड प्रणालीचा लाभ डॉक्टर व रुग्णांना होणार आहे, अशी माहिती आयुक्त गुप्ता यांनी दिली.उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, निदान केंद्राचे प्रशासकीय अधिकारी काका हलवाई उपस्थित होते.

रुग्णांचे वाचले 3.49 कोटी

महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राचा रुग्णांना चांगला लाभ झाला आहे. 30 जून 2024 अखेर 47 हजार 483 रुग्णांनी 1 लाख 34 हजार 559 चाचण्या केल्या आहेत. महापालिकेस 39 लाख 13 हजार 704 रुपये शुल्क मिळाले आहे, तर रुग्णांचे 3 कोटी 48 लाख 85 हजार 440 रुपये वाचले आहेत.

SCROLL FOR NEXT