प्रमोद चव्हाण, तासगाव
हाता-तोंडाशी आलेला घास केवळ काही चुकांमुळे जाण्यासारखा प्रकार आमदार रोहित पाटील यांच्याबाबतीत घडला. थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदावरही शरदचंद्र पवार गटाला हात धुवावे लागले. केवळ अकरा जागांवर समाधान मानावे लागले. माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘फिनिक्स’ भरारी घेतली.
तासगाव नगरपालिका हा तसा आर. आर. आबा पाटील यांचा बालेकिल्ला. 2015 नंतर यावर माजी खासदार संजय पाटील यांनी ताबा मिळवला. दहा वर्षे पालिकेत सत्ता ताब्यात ठेवली. यानंतर आमदार म्हणून रोहित पाटील मैदानात उतरले. विधानसभा आणि लोकसभेला पराभव झाल्याने संजय पाटील यांच्यासमोर अडचणींचा डोंगर होता. मात्र केवळ कार्यकर्ता हाच माझा पक्ष, अशी शपथ घेऊन त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांच्या जिवावर लढवण्याचा निर्णय घेतला आणि बाजी मारली.
लोकसभा आणि विधानसभेला झालेल्या चुकांवर अभ्यास करून यावेळची गणिते मांडली. शांत राहून प्रचार करण्यात आला. याउलट आमदार रोहित पाटील यांनी मात्र धडाका लावला. काही ठिकाणी राजहट्ट म्हणून चुकीचे उमेदवार देण्यात आले आणि येथेच किल्ल्याला खिंडार पडायला सुरुवात झाली. जनता माझ्याकडे बघून सत्ता देईल, हा मोठा भ्रमनिरास झाला. दुसरीकडे संजय पाटील यांनी थेट नगराध्यक्ष पदासह तब्बल 13 जागांवर पकड घट्ट करून पालिकेवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
रोहित पाटलांचा अहंकार नडला?
तासगाव नगरपालिका निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांना उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र अचानक उमेदवार बदलण्यात आला. वासंती बाळासाो सावंत यांना देण्यात आलेली उमेदवारी कितपत चालणार, याबाबत कार्यकर्त्यांमधूनच शंका निर्माण होत असताना, आमदार रोहित पाटील यांनी, माझ्याकडे बघून जनता सत्ता देईल, ही भावना ठेवून उमेदवारी चालवली. प्रत्यक्षात हाच अहंकार नडला. कार्यकर्ते आणि पक्षातील अनुभवी जाणकारांशी चर्चा करून निर्णय घेतला असता, तर पालिकेवर सत्ता मिळाली असती, अशी चर्चा निकालानंतर सुरू राहिली.