Crime News pudhari photo
सांगली

Sangli Crime: कोट्यवधीच्या सोने तस्करी कनेक्शनमुळे सांगलीची बदनामी

कर चुकवण्यासाठी वाढती संघटित आर्थिक गुन्हेगारी

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत शिंदे

सांगली : आसाममधील गुवाहाटी येथे उघडकीस आलेल्या ५५ कोटी रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणामुळे सांगली जिल्ह्याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आले आहे. कर चुकवण्यासाठी संघटित आर्थिक गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल विश्लेषणातून या काळ्या बाजाराचे पश्चिम महाराष्ट्राशी असलेले थेट धागेदोरे स्पष्ट झाले आहेत. आसाम पोलिसांच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी सोन्याची जप्ती मानली जात आहे.

या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे याचे थेट 'सांगली कनेक्शन' समोर आले आहे. गुवाहाटी पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या जाळ्यातून ज्या मुख्य एजंटला रंगेहाथ अटक केली, तो अक्षय बनसोडे हा तरुण मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची गावचा आहे.

सांगली जिल्हा, विशेषतः आटपाडी, विटा, तासगाव आणि मिरज हा भाग पिढ्यानपिढ्या मुंबई-पुण्यासह देशभरातील सुवर्ण बाजाराशी आणि सराफी कारागिरीशी जोडलेला आहे. याच नेटवर्कचा गैरफायदा आंतरराष्ट्रीय तस्करांनी घेतलेला दिसतो. स्थानिक सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना महिन्याला ८० ते ९० हजार रुपयांचे फिक्स मानधन आणि कमिशनचे आमिष दाखवून या चक्रव्यूहात ओढले जात आहे. अटक करण्यात आलेला बनसोडे हा गेल्या दोन वर्षांपासून गुवाहाटीत होता. यापूर्वी त्याने तीन वेळा सुमारे २० किलो सोन्याची तस्करी यशस्वीपणे पार पाडली असून कोट्यवधी रुपयांचे अवैध सोने आधीच बाजारात पोहोचविल्याची माहिती समोर आली आहे.

तस्करांची कार्यपद्धती अत्यंत गोपनीय आहे. हे सोने प्रामुख्याने म्यानमार किंवा मध्य पूर्वेतील देशांमधून समुद्र आणि भूमार्गे बांगलादेश किंवा मणिपूरच्या सीमावर्ती भागातून भारतात छुप्या मार्गाने आणले जाते. ईशान्य भारताची आंतरराष्ट्रीय सीमा डोंगराळ आणि घनदाट जंगलांची असल्याने तिथे तपासणी करणे कठीण होते. सीमेवरून हे सोने गोळा करण्यासाठी गुवाहाटी हे केंद्र म्हणून वापरले जाते. पकडले जाऊ नये म्हणून संशयिताने चक्क भिकाऱ्याचा वेश परिधान केला होता आणि हातात जुनी घोंगडी व कपडे घेतले होते. मात्र, त्या घोंगडीच्या आत २४ कॅरेट शुद्ध सोन्याची तब्बल ३७ किलो वजनाची बिस्किटे लपवलेली होती.

भारतात सोन्यावर असणारे उच्च आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटीमुळे कायदेशीर मार्गाने सोने आणणे अत्यंत महाग पडते. याउलट, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर भारतापेक्षा कमी असल्याने, करांची ही चोरी तस्करांना प्रति किलोमागे लाखो रुपयांचा नफा मिळवून देते. याशिवाय कोणत्याही पक्क्या बिलाशिवाय आणि कागदपत्रांशिवाय सोन्याची रोखीने खरेदी-विक्री होत असल्याने, हवाला चॅनेलद्वारे फिरणारा काळा पैसा सोन्यामध्ये सुरक्षित केला जातो आणि नंतर हाच पैसा देशातील मोठ्या शहरांमधील सुवर्ण बाजारात फिरवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT