Financial scam: कोट्यवधीचा गंडा घालणारे बंटी-बबली अखेर जेरबंद Pudhari
सांगली

Financial scam: कोट्यवधीचा गंडा घालणारे बंटी-बबली अखेर जेरबंद

पाच वर्षांपासून फरार; क्रिप्टो करन्सी, जमीन विक्री प्रकरणात फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कोट्यवधीचा गंडा घालून गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या मिरजेतील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय 51) व जस्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (41, रा. गुरुवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या बंटी-बबलीच्या जोडीस विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी गोव्यातून अटक केली. क्रिप्टो करन्सी, जमीन विक्रीप्रकरणी फसवणुकीसह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ते पसार होते. दरम्यान, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‌‘क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत रक्कम दुप्पट करून देतो‌’ असे सांगून इब्राहिम नायकवडी, त्याचा भाऊ अब्दुलमहंमदसाब नायकवडी, इब्राहिमची पत्नी जास्मिन नायकवडी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिघांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची तब्बल 2 कोटी 15 लाख 55 हजारांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले होते. या प्रकरणात अब्दुल नायकवडी याला पोलिसांनी अटक केली होती. परंतु इब्राहिम व जास्मिन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती.

इब्राहिम व जास्मिन यांनी त्यानंतर सांगलीतील अशोक मासाळे यांच्या श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सल्टंट या फर्मकडे जागा विकसित करण्यासाठी करार केला होता. त्यासाठी रक्कम घेतली होती. परंतु प्रत्यक्षात करार पूर्ण न करता मासाळे यांची 36 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. मासाळे यांनी पैसे परत मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जास्मिन हिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. अखेर मासाळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता, तसेच नायकवडी दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंटी-बबली जोडीकडून खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करून त्यांच्या अटकेसाठी मासाळे यांनी उपोषणाचा इशारा गतवर्षी दिला होता.

क्रिप्टो करन्सी, विश्रामबागमधील फसवणुकीचा गुन्हा, मिरजेतील ॲट्रॉसिटीचा गुन्हा, यामध्ये नायकवडी दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. आर्थिक गुन्हे अन्वेषणसह, विश्रामबाग पोलिस, मिरज पोलिस त्यांच्या मागावर होते. ही जोडी गोवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने गोवा गाठले. अंजुना पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन नायकवडी दाम्पत्याला अटक करून विश्रामबाग ठाण्यात आणले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी रवानगी करण्यात आली. आता विश्रामबाग पोलिस, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज पोलिस त्यांचा ताबा मागणार आहेत.

मिरजेतील नामांकित डॉक्टर, राजकीय नेत्यालाही गंडा

मिरजेतील या बंटी-बबलीने एक नामांकित डॉक्टर व एका बड्या राजकीय नेत्याला भुरळ घालत चांगलाच गंडा घातला आहे. त्यातील काहींनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, तर काहींनी बदनामी नको, म्हणून तक्रार देण्याचे टाळले आहे.

खिडकी तोडून घेतला ताबा

इनामदार दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत गायब होते. ते गोवा येथे एका घरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग व गोवा पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. कारवाईवेळी ते दरवाजा उघडत नव्हते. वाट पाहून दीड तासानंतर पोलिसांनी खिडकी तोडून घरात प्रवेश करीत त्यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT