सांगली : नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवर खासदार विशाल पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढणारी ही मुले आतंकवादी किंवा चोर नाहीत. त्यांच्याशी असा अमानवी व्यवहार करणे अत्यंत दुर्दैवी आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्लीत माध्यमांसमोर व्यक्त केली.
काँग्रेस नेत्यांसह महात्मा गांधी यांच्या स्मारकस्थळी अभिवादन केल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. पाटील म्हणाले, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना पोलिसांनी ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली, ते अत्यंत वाईट आणि निषेधार्ह आहे.
राहुल गांधी यांच्यासह आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही; कारण राजकीय जीवनात आम्हाला त्याची सवय आहे. मात्र, सामान्य आणि निष्पाप विद्यार्थ्यांना का मारताय? ती मुले केवळ स्वतःच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळेच आम्ही महात्मा गांधीजींच्या चरणी प्रार्थना केली आहे की, या सरकारला सद्बुद्धी मिळो. ही मुले देशाची नागरिक आहेत, ती आतंकवादी, चोर किंवा देशद्रोही नाहीत. तुमच्या ढिसाळ कारभाराला कंटाळलेले हे युवक आहेत, त्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.