पलूस/आंधळी : मोराळे (ता. पलूस) येथे येरळा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. 13 जानेवारीरोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. साईप्रसाद समाधान कदम (वय 23, रा. गणेश शिक्षक कॉलनी, पलूस) असे मृताचे नाव आहे.
याबाबत समाधान बाबासाहेब कदम (वय 51, रा. गणेश शिक्षक कॉलनी, पलूस) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोराळे गावाजवळ येरळा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेला साईप्रसाद शेवाळावरुन पाय घसरून पाण्यात पडला. पाण्यात बुडून त्यचा मृत्यू झाला.
साईप्रसाद कदम मूळचा पलूस तालुक्यातील मोराळे येथील रहिवासी होता. उच्चशिक्षित असलेला साईप्रसाद केटरिंग व्यवसायाच्या निमित्ताने पत्नीसमवेत मुंबई येथे वास्तव्यास होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. संक्रांतीनिमित्त तो पलूस येथे आई-वडिलांकडे आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भोगीनिमित्त ‘मी गावी जाऊन येतो’ असे घरी सांगून साईप्रसाद मोराळे येथे आला होता. सायंकाळी येरळा नदीपात्रात तो अंघोळीसाठी उतरला. यावेळी नदीतील बंधाऱ्याजवळ असलेल्या कठड्यावर साचलेल्या शेवाळावरून त्याचा पाय घसरला. तोल जाऊन तो थेट नदीपात्रात पडला. पोहता येत नसल्याने तो प्रवाहात अडकला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिस ठाण्याच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.