पलूस : कृष्णा नदीला कारखान्यांच्या मळीमिश्रित पाण्याचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. गुरुवारी कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडताच हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने पाण्याचा रंग काळेभोर होऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी नसल्याने कृष्णा नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे पिण्याचे पाणी व शेतीचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आमदार डॉ. विश्वजित कदम, यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने गुरुवारी कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडले. मात्र, पाणी आल्याचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पलूस तालुक्यातील आमणापूर, बुर्ली व भिलवडी परिसरात कराडच्या दिशेने आलेले पाणी मळीमिश्रित असल्याचे स्पष्ट झाले. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने हजारो मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना व काठावर पडलेले दिसत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती आणि मगरींसह अन्य जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यावरण विभागाने केवळ कागदी अहवालापुरती कारवाई न करता तातडीने पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत शोधून दोषी कारखानदारांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.