सांगली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील व शिवसेना ठाकरे गटाशी लवकरच चर्चा करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या असून, आता राज्य सरकारने त्यांची फसवणूक करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस भवनामध्ये काँग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जितेश कदम, प्रा. डॉ. शिकंदर जमादार आदी उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले की, आमची राज्यात महाविकास आघाडीबरोबर युती आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्येही आघाडी करण्यात येणार आहे.
ते म्हणाले, महापालिका निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. काहीजण स्वार्थापोटी काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते, सामान्य जनता काँग्रेसच्या विचारधारेला मानणारी आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सध्याचे सरकार हे मतांची चोरी करून सत्तेवर आले आहे. यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर, जातीयतेचे राजकारण केले आहे. यासंदर्भात आमचे नेते राहुल गांधी यांनी मोहीम सुरू केली आहे. याबाबत सांगलीतही पडताळणी करण्यात येईल.
ते म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यांच्या कामानुसार संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्यांत काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. पण अनेकजण काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे येणार्या काळात पक्षाचे संघटन वाढविले जाईल.
ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याने मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलन करावे लागले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व प्रथम काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री काळात प्रयत्न केले आहेत.
वेळेअभावी कार्यकर्त्यांशी चर्चा झाली नाही..
काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, असा आरोप होत आहे, याबाबत विचारता आमदार कदम म्हणाले की, खासदार विशाल पाटील हे संसदेमध्ये, तर मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गुंतून राहिलो. त्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होताना खूपच धावपळ झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना वेळ देता आली नाही. अनेकांशी चर्चा करता आली नाही. यापुढे कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल.
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष लवकरच निवड
सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून सांगली शहर जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष निवडताना त्यांचा महापालिकेचा अनुभव, ज्येष्ठता याचा विचार करण्यात येणार आहे. तसेच त्याचे जनमानसातील स्थान याचीही पाहणी करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षाकडे शिफारस करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष त्यांची निवड जाहीर करणार आहेत, अशी माहिती आमदार कदम यांनी दिली.