कडेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्या प्रवृत्तींचा निषेध करत, राज्य सरकारने अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणार्या कोणत्याही प्रवृत्तीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असा इशारा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.
कदम म्हणाले, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर फरार असताना, त्याला कोणाचा पाठिंबा होता? त्याला पळून जाण्यास मदत कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने शोधलीच पाहिजेत. महाराष्ट्राच्या अस्मितेवर जे कोणी घाव घालतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही गंभीर बाब आहे. पुणे आणि जत येथील घटना हृदय पिळवटून टाकणार्या आहेत. आरोपी मोकाट फिरत असताना प्रशासन निष्क्रिय का होते? राज्यातील पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या असामान्य शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला. या ऐतिहासिक निर्णयाचे डॉ. कदम यांनी स्वागत केले. याच न्यायाने अहिल्यादेवी होळकर यांनादेखील भारतरत्न मिळावा, ही जनभावना आहे, असे ते मांडले.
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 15 वर्षांहून अधिक जुन्या रुग्णवाहिका वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार विधानभवनात उघड करत, जिल्हा परिषदेचा प्रस्ताव असूनही निधी का मंजूर झाला नाही, याबाबत डॉ. विश्वजित कदम यांनी सरकारला जाब विचारला. आरोग्य सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची त्यांनी मागणी केली.
कदम म्हणाले, जलजीवन मिशन योजनेंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही अनेक गावांमध्ये कायम असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ठिबक सिंचन योजनेतील अनुदान रखडल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राला पुराचा गंभीर धोका निर्माण होण्याची भीती आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने कर्नाटक सरकारसोबत चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी भूमिका डॉ. कदम यांनी मांडली.