ईश्वरपूर : साखरेचे वाढलेले दर, दुष्काळी परिस्थिती आणि उसाची घटलेली उपलब्धता या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारखानदारांची बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबररोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
खोत म्हणाले, यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून उसाचे क्षेत्रही घटले आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाची तोड होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना उसाची मोठी कमतरता भासणार आहे. सध्याची उपलब्धता पाहता कारखान्यांचा गळीत हंगाम जेमतेम तीन महिने चालण्याची शक्यता आहे. त्यात साखरेचे दरही वाढणार आहेत. या परिस्थितीत कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाला किमान प्रतिटन पाच हजार रुपये दर देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील कारखानदार ऊसदराच्या प्रश्नावर सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. याबाबत बोलण्यासाठी एकही कारखानदार पुढे येत नसल्याची टीका त्यांनी केली.
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न तातडीने सोडवावा. या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आणि पृथ्वीराज पवार सहभागी होणार आहेत, असे खोत यांनी सांगितले.
यावेळी नियोजन समितीचे सदस्य अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य विनायक जाधव, किरण उथळे, संदीप फार्णे, शशिकांत शेळके, सर्फराज डाके, विकास पाटील, संदीप पाटोळे उपस्थित होते.