मळणगाव :
‘कुछ तो मजबूरीयाँ रही होंगी,
यूँ कोई बेवफा नहीं होता ।’
ही शायरी कुण्या प्रियकराने प्रेयसीला उद्देशून पेश केलेली नसून, हे शब्द आहेत तासगाव - कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्या, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरील प्रतिक्रियेचे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे करण्यास तत्वत: मान्यता मिळाली होती. उपकेंद्र खानापूर तालुक्यात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आमदार पाटील यांनी व्यथित होऊन शायराना अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुंबईत महाविकास आघाडीच्या ना. उदय सामंत यांच्या दालनात बैठक पार पडली होती. बैठकीला तत्कालीन आमदार सुमन पाटील, उच्चशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, अॅड. धैर्यशील पाटील, मी स्वत: आणि अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सामंत म्हणाले की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. अनेक दिवसांपासूनचे त्यांचे हे स्वप्न होते. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल.
या बैठकीतच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास सरकारने तत्त्वत: मान्यता दिली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तशा सूचना दिल्या. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उच्चशिक्षण विभागास दिल्या आहेत. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार होता. पण अचानकपणे उपकेंद्र खानापूर येथे होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. बस्तवडे येथील प्रस्तावाला नकार का दिला ? याबाबत मात्र काही स्पष्टता राज्य सरकारने दिलेली नाही.
आमदार रोहित पाटील म्हणाले, बस्तवडे येथील जागेची शिफारस तत्कालीन आमदार सुमन पाटील यांनी केली होती. विद्यापीठ समितीने त्या जागेची पाहणीही केली होती. याच जागेत उपकेंद्र उभारण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु प्रस्तावित जागेवर अशा कांही लोकांचा डोळा होता, ज्यांनी प्रयत्न केले असते, तर कदाचित उपकेंद्र तासगाव तालुक्यात होण्यासाठी मदत झाली असती. परंतु त्यांनी थेट विरोध केला नाही.