सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, सांगली महापालिकेत शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीत तळ ठोकला असून इच्छुकांशी चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून जातील यासाठी त्यांची रणनीती सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. जयंत पाटील यांनी महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती स्वतः घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षनिष्ठ आणि जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यावर त्यांचा भर आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी त्यांनी असाच आष्टा व इस्लामपूर येथे तळ ठोकलेला होता.
सांगली महापालिका क्षेत्रातही जयंत पाटील यांची मोठी ताकद आहे. त्यांच्याबरोबर असलेले अनेक शिलेदार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात गेलेले आहेत. काहीजण भाजपमधून इच्छुक आहेत, बाकी राहिलेल्यांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढताना जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यावर ते रणनीती आखत आहेत. प्रभाग रचनेनुसार त्यांनी बांधणी सुरू केली आहे. निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख इच्छुकांशी मंगळवारी त्यांनी चर्चा करून निवडणूक कशा पद्धतीने लढवणार, अशी विचारणा केली. या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी आतापर्यंत 135 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. बैठकीत त्यांच्याबरोबर संपर्कप्रमुख शेखर माने, माजी नगरसेवक हरिदास पाटील आदी उपस्थित होते.
काँग्रेसबरोबर आज चर्चा
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस व इतर विरोधी पक्षांची महाविकास आघाडी होणार आहे. त्यात जागा वाटपाबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर आज चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेतेही प्राथमिक चर्चा करणार आहेत.
शिवसेनेच्या दोन्ही गटात शांतता
महापालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांत फारशा हालचाली नाहीत.