मिर्झा इराणने पटकावला ‌‘छत्रपती केसरी‌’ किताब  
सांगली

Wrestling Tournament : मिर्झा इराणने पटकावला ‌‘छत्रपती केसरी‌’ किताब

नाणेफेकीत सोनाली मंडलिकने पटकावला ‌‘जिजाऊ केसरी‌’ किताब

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भारत केसरी शेरा गुज्जर आणि जागतिक विजेता मिर्झा इराण याची उत्सुकता हजार कुस्ती प्रेमींना लागली होती. अटीतटीच्या लढतीत मिर्झाने चपळपणाने शेरावर कब्जा मिळविला अन्‌‍ टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष झाला. मिर्झाला सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते श्री छत्रपती केसरी किताबाने गौरविले. तर महिलांमध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि सोनाली मंडलिक यांनी बराचवेळ लढत दिल्यानंतर नाणेफेकीवर कौल देण्याचे ठरले. सोनालीने नाणेफेक जिंकून राजमाता जिजाऊ केसरी किताब पटकावला.

सांगलीतील सरकारी घाटावर कुस्ती प्रेमी ग्रुपतर्फे आयोजित भारत विरुद्ध इराण अशा कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सुरू झाली. 165 किलो वजनाचा शेरा गुज्जर आणि जागतिक विजेता मिर्झा इराण दोघेही तुल्यबळ होते. महाकाय शेरासमोर ताकदीने व वजनाने थोडा कमी असलेला मिर्झा तग धरणार काय? याची उत्सुकता ताणली होती. तरीही मिर्झाने पाचव्या मिनिटाला पट काढण्याचा प्रयत्न केला. दोघेजण एकमेकांची ताकद आजमावताना घामाघूम झाले. 25 व्या मिनिटापर्यंत दोघांचे गुडघे मैदानावर टेकले नव्हते. अर्ध्या तासानंतर पंच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्ती गुणावर घेतली. तेव्हा आक्रमक होत मिर्झाने शेरावर कब्जा घेत गुण वसूल केला. त्याला विजयी घोषित करताच शौकिनांनी जल्लोष केला.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या हांडे -पाटील तालमीचा सुबोध पाटील विरूद्ध पंजाबच्या अमित कुमार यांच्यातील लढतीत अवघ्या काही मिनिटांत पोकळ घिस्सा डावावर सुबोधने अमित कुमारला चितपट केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सांगलीचा सुदेश ठाकूर हा कुंडलच्या धीरज पवार विरुद्ध गुणावर विजयी झाला. चौथ्या क्रमांकाची सांगलीच्या पृथ्वीराज पवार विरुद्ध कोल्हापूरच्या सत्पाल नागटिळक यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. पवार तालमीच्या बाळू अपराधने शेखर दोडकेला नागपट्टी डावावर चितपट केले. सांगलीच्या गुलफाम मुजावरने कर्नाटकच्या अजित सूर्यवंशीला चितपट केले. विशाल शेळके याने सचिन माने याला पराभूत केले.

अन्य कुस्त्यांचा निकाल असा : जीवन तामखडे विजयी विरुद्ध करण द्रोही, ऋषिकेश देवकाते वि. वि. राहुल आलदर, दत्ता खोत वि. वि. अंकुश माने, रोहित मुळके, वि. वि. संतोष पाटील, इंद्रजित मुळे, वि. वि. कुबेर राजपूत, संतोष इरकर, वि. वि. रोहित पंजाब, पवन बागडी विरुद्ध प्रसाद सासणे, प्रणव पवार विरुद्ध रोहित चव्हाण, साहिल मोरे, वि. वि. गौरव कारंडे, नाथा पवार वि. वि. संदेश चिपकुले, राहुल कोरडे, वि. वि. किरण राणे यांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. तसेच ओंकार काटकर, अमोल माने, कृष्णा सावंत यांनी प्रतिस्पर्धी मल्लाचा पराभव केला. कुस्ती मैदानासाठी सांगली संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, माजी आमदार नितीन शिंदे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. कुस्ती प्रेमी ग्रुपने नेटके संयोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT