मिरजेत भाजपची ताकद वाढली 
सांगली

Miraj ZP Election Results : मिरजेत भाजपची ताकद वाढली

आ. खाडेंचा करिष्मा कायम : काँग्रेसचा पाय खोलात

पुढारी वृत्तसेवा

मिरज : जिल्हा परिषद व मिरज पंचायत समितीमध्ये मिरज तालुक्यातून सर्वाधिक सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्याने मिरज तालुक्यात पुन्हा एकदा भाजपची ताकद वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीतही आमदार सुरेश खाडे यांचा करिष्मा चालला आहे. काँग्रेस पक्षाचा पाय मात्र आणखीणच खोलात गेल्याचे स्पष्ट झाले, तर राष्ट्रवादीने पुन्हा डोके वर काढल्याचेही दिसून आले.

मिरज हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2009 नंतर हा भाजपचा बालेकिल्ला झाला. आमदार सुरेश खाडे यांनी हा करिष्मा घडविला. लोकसभा, विधानसभा, महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये भाजपचाच बोलबाला सुरू झाला. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मिरजेत भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले. आता झालेल्या जिल्हा परिषद व मिरज पंचायत समितीमध्येही भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यातून भाजपचे जिल्हा परिषदेमध्ये 7 सदस्य निवडून गेले होते. यंदा सहा सदस्य निवडून आले आहेत. मिरज पंचायत समितीमध्ये मात्र 2017 मध्ये 10 सदस्य निवडून आले होते. यंदाही 10 सदस्य निवडून आले आहेत. काँग्रसचे 3, अजित पवार राष्ट्रवादीचे 3, शरद पवार राष्ट्रवादीचे 4, तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे 2 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांसह सत्ता स्थापन करू शकते.

सभापतीपद कवलापूरला...

27 वर्षांनंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेस सभापती पदाची संधी मिळणार आहे. टाकळी व कवलापूर या दोन मतदार संघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण होते. टाकळीमधून रिदा मुजावर या अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. मात्र त्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून निवडून आल्या आहेत. सत्ता भाजपची आली तर मुजावर यांना संधी शक्य नाही. कवलापूर येथून भाजपच्या राणी भोरे निवडून आल्या आहेत. त्यामुळे भोरे यांच्या गळ्यात मिरज पंचायत समितीची माळ पडू शकते.

अध्यक्षपदाच्या रांगेत...

आरग जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपच्या शोभा वसंत खोत निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला असे आहे. त्यामुळे भाजप महायुतीची सत्ता आली तर शोभा खोत अध्यक्षपदाच्या रांगेत राहतील.

सर्व नवे उमेदवार...

मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 आणि मिरज पंचायत समितीच्या 22 जागांसाठी 94 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये विद्यमान सदस्यही होते. मात्र जनतेने एकही विद्यमान सदस्य निवडून दिला नाही. सर्व सदस्य नवे निवडून आले.

यंदा मात्र विजयी...

2017 च्या निवडणुकीमध्ये बामणोली गणातून संदीप बंडगर अपक्ष लढले आणि पराभूत झाले होते. मात्र यंदा ते याच मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये शोभा खोत आघाडीकडून पंचायत समितीसाठी उभ्या होत्या. त्यावेळी त्यांचा केवळ 24 मतांनी निसटता पराभव झाला होता. यंदा मात्र भाजपच्या तिकिटावर आरग मतदार संघातून त्या विजयी झाल्या.

काँग्रेसची पुन्हा पीछेहाट...

यंदा मात्र काँग्रेसला बुधगाव आणि कसबेडिग्रज या दोन जागा मिळाल्या आहेत. मिरज पंचायत समितीमध्ये 2017 मध्ये काँग्रेसचे 7 सदस्य निवडून आले होते. यंदा मात्र ही संख्या घटून 3 झाली आहे. नरवाड येथे तन्वी कमलेकर, समडोळी येथे शोभा मोहिते, इनामधामणी येथे सूरज मगदूम काँग्रेसकडून विजयी झाले.

दोन्ही राष्ट्रवादी वाढल्या...

2017 च्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा एकही सदस्य नव्हता. यंदा मात्र अजित पवार गटाचा एक आणि शरद पवार गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. मिरज पंचायत समितीमध्ये 2017 मध्ये राष्ट्रवादीचे केवळ दोन सदस्य निवडून आले होते. यंदा मात्र अजित पवार गटाचे 3 आणि शरद पवार गटाचे 4 सदस्य निवडून आले आहेत.

शिवसेना किंगमेकर

मिरज पंचायत समितीमध्ये गुंडेवाडी येथून ललिता शेजुळे, तर बुधगाव येथून पांडुरंग इंगळे हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले. मिरज पंचायत समितीमध्ये शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत दिसू शकते. अर्थात मोहन वनखंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे.

पॅनेल टू पॅनेल मतदान

भोसे जिल्हा परिषद व भोसे, सोनी पंचायत समितीमध्ये भाजपचे 3, आरग जिल्हा परिषद व खटाव, पंचायत समितीमध्ये भाजपचे 3, कवलापूर जिल्हा परिषद व पंचायत, बामणोली पंचायतमध्ये भाजपचे 3 विजयी झाले. एरंडोली जिल्हा परिषद व एरंडोली, सलगरे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे 3 विजयी झाले. कवठेपिरान जिल्हा परिषद व दुधगाव पंचायत समिती, कवठेपिरान पंचायत समितीमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे 3, म्हैसाळ जिल्हा परिषद, म्हैसाळ पंचायत समिती, टाकळी पंचायत समितीमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे 3 विजयी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT