मिरज : मिरज पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव देण्यावरून भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. यापूर्वी झालेल्या दोन सभांमध्येही नव्या सभागृहावरून वाद निर्माण झाला होता. सलग तिसऱ्या सभेतही याच विषयावरून सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली.
सभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) सदस्या संयोगिता कोळी यांनी नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे सदस्य विनायक जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले. मात्र, भाजपच्या अन्य सदस्यांनी यावर तातडीने आक्षेप घेतला. नूतन इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वी नाव निश्चित करू नये, अशी भूमिका भाजपच्या राणी भोरे यांनी घेतली. आमचा विरोध वसंतदादा पाटील यांच्या नावाला नसून केवळ प्रक्रियेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भाजपचे सदस्य विनोद गायकवाड यांनी नवीन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली, तर संदीप बंडगर यांनी सभागृहाला राष्ट्रपुरुषांचेच नाव द्यावे असे सांगितले. ठराव मंजूर झाल्यानंतर आक्षेप घेऊ नका, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घेतली. या विषयावरून महायुतीच्या सदस्यांमध्येच एकमत नसल्याचे दिसून आले. अखेर नावाला विरोध करणाऱ्या सदस्यांच्या हरकतींची नोंद घेण्यात आली असून, पुढील बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गटविकास अधिकारी मडके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मिरजेचे माजी आमदार मोहनराव शिंदे आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांचे छायाचित्र सभागृहात लावण्याचा ठराव राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) सदस्या गायत्री सुशांत घोरपडे यांनी मांडला, तो एकमताने मंजूर करण्यात आला.