जालिंदर हुलवान
मिरज : शहरातील भाजी मंडई आणि आठवडा बाजाराचा प्रश्न आता तातडीने सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रमुख रस्त्यांवर भरणारे हे आठवडा बाजार वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोक्याचे बनले आहेत. वास्तविक, रस्त्यावर भरणारे दैनंदिन आणि आठवडा बाजार ज्या त्या परिसरातील महापालिकेच्या खुल्या भूखंडांवर हलवणे सहज शक्य आहे. यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि स्थानिक कारभाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
मार्केट व किल्ला भागातील खंदकातील सुमारे दोन एकर जागेवर १९७९ मध्ये भाजी मार्केटचे आरक्षण टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्या जागेवर भव्य भाजी मंडई बांधण्याची मागणी होत होती. १९८९ पासून या मागणीने चांगलाच जोर धरला आणि यासाठी शहरात अनेक आंदोलनेही झाली. मार्केट परिसरातील पार्किंगचा बिकट प्रश्न आणि नागरिकांना होणारा त्रास कायमचा संपवण्यासाठी नव्या भाजी मंडईची नितांत गरज होती. ही बाब ओळखून पाच वर्षांपूर्वी येथील खंदकामध्ये सुमारे १३ कोटी रुपये खर्चून नवीन भाजी मंडईचे बांधकाम सुरू करण्यात आले. आता हे काम पूर्ण झाले असून, या मंडईकडे जाण्यासाठी केवळ एका रस्त्याची आवश्यकता आहे. हा रस्ता उपलब्ध होताच नवीन भाजी मंडई लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
असे असले तरी शहरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरच आठवडा बाजार भरत आहेत. मिरजेत रविवारी गुरुवार पेठ परिसरात, मंगळवारी चर्च रस्ता-मंगळवार पेठ, बुधवारी मार्केट ते गाढवे चौक, गुरुवारी माजी सैनिक वसाहत, शुक्रवारी कर्मवीर भाऊराव पाटील चौक, तर शनिवारी शास्त्री चौक येथे आठवडा बाजार भरतो. हे सर्व रस्ते शहराच्या वाहतुकीचे प्रमुख मार्ग असल्याने बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. यापूर्वी या बाजारांमध्ये लहान-मोठे अपघातही झाले आहेत.
याशिवाय उन्हाळ्यात भाजी विक्रेत्यांना तीव्र उन्हात बसावे लागते, तर पावसाळ्यात चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे त्यांचे हाल होतात. एकीकडे आठवडा बाजार रस्त्यावर भरून कोंडी होत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या ताब्यातील अनेक खुले भूखंड वापराविना पडून आहेत. या मोकळ्या भूखंडांवर भूमाफियांचा डोळा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या ज्या भागात आठवडा बाजार भरतो, तेथील महापालिकेचे खुले भूखंड या बाजारांसाठी कायमस्वरूपी वापरणे शक्य आहे.
तसे झाल्यास भाजी विक्रेते आणि ग्राहक यांची मोठी सोय होईल, तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटेल. रस्त्यावर बाजार भरल्याने स्थानिक रहिवाशांनाही आपल्या घरी जाणे कठीण होते आणि वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण होते. तसेच बाजार संपल्यानंतर रस्त्यावर टाकून दिलेल्या खराब भाजीपाल्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यांवरील आठवडा बाजार तात्काळ मनपाच्या खुल्या जागांवर हलवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.