मिरज : येथील किसान चौकातील महानगरपालिकेच्या जुन्या रुग्णालयाच्या जागेत लहान मुलांवरील उपचारांसाठी व महिलांसाठी 100 खाटांचे शासकीय रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्याच्या निविदेस मंजुरी मिळाली असून लवकरच कामाचा प्रारंभ होणार आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर लहान मुले व महिलांसाठी उपचारांची चांगली सोय होणार आहे.
मिरज हे येथील वैद्यकीय केंद्रामुळे प्रसिद्ध आहे. किसान चौकामध्ये महापालिकेचे रुग्णालय आहे. संस्थान काळात 1864 मध्ये हे रुग्णालय बांधण्यात आले. त्याला 160 वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण दगडी बांधकाम असणारी ही सुंदर इमारत त्याकाळी केवळ 3 लाख 472 रुपयांत बांधण्यात आली होती. प्रथम ही इमारत मिरज हायस्कूलसाठी बांधण्यात आली होती. पण मिरज हायस्कूलचे स्थलांतर झाल्याने ही इमारत रुग्णालयाला देण्यात आली. 1955 मध्ये शासनाने तत्कालीन नगरपालिकेला हे रुग्णालय चालवण्यास दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या दोन्ही बाजूस दुकान गाळे बांधण्यात आले. परिसरात खोक्यांचेही अतिक्रमण झाले.
याच ठिकाणी आता शंभर खाटांचे नवे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा 46 कोटी रुपयांचा निधी गेल्या 2 वर्षापासून शासनाकडे आहे. 2023 मध्ये हे काम सुरू करण्यास गती आली. मात्र रुग्णालयासाठी जागा कमी पडत असल्याने हे काम रखडले होते. त्यासाठी जागेची मोजणी झाल्यानंतर हे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 11 महिन्यांपूर्वी 30 जानेवारी 2024 रोजी या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते. या उद्घाटनानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कात्रीमध्ये हे काम अडकले होते. शासनाच्या मंजुरीनंतर आता या कामाची निविदा अंतिम झाली आहे.