Fraud Case 
सांगली

Miraj Fraud Case : मिरजेतील कापड व्यावसायिकास सव्वा कोटींचा गंडा

गुजरातमधील तीन भामट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल; पैसे मागितल्यास 'गेम' करण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

मिरज : कापड खरेदी करून गुजरातमधील तिघांनी मिरजेतील कापड व्यावसायिकाची १ कोटी २३ लाख ७२ हजार ६६१ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नरेंद्र रामनिवास बजाज यांनी कुणाल अनिलकुमार गुप्ता, नीलम गुणाल गुप्ता आणि अनिलकुमार गिरीराज गुप्ता (सर्व रा. न्यू क्लॉथ मार्केट, रायपूर, सारंगपूर, गुजरात) यांच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिरजेतील नरेंद्र बजाज हे कापड व्यावसायिक आहेत. गुजरातमधील संशयितांनी बजाज यांच्या मिरजेतील 'गोपाल यार्न ट्रेडर्स'मधून १ कोटी ९८ लाख ५१ हजार २६५ रुपयांच्या कापडाची खरेदी केली होती. त्या कापडाच्या बिलापोटी त्यांनी बजाज यांना ७४ लाख ७८ हजार ६०४ रुपयांची रक्कम दिली होती.

परंतु, कापड खरेदी करून देखील उर्वरित १ कोटी २३ लाख ७२ हजार ६६१ रुपयांची रक्कम संशयितांनी दिली नाही. उर्वरित रकमेची मागणी केली असता, ‘पैसे देणार नाही, पुन्हा पैसे मागितलास तर खोट्या केसमध्ये अडकवेन आणि मिरजेतील कार्यालयात येऊन तुझी गेम करीन’, अशी धमकी दिल्याचे बजाज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT