मिरज : येथील बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी सुरू आहे. यामध्ये स्पर्धकांकडून दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले जात आहे. ही नाटके बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी दिसते. दि. 27 नोव्हेंबरपर्यंत या नाट्य स्पर्धा होणार आहेत. ‘ती तुझ्याकडे बघतेय’ आणि ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ ही दोन नाटके बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
‘ती तुझ्याकडे बघतेय’ हे सादर झालेले नाटक विक्रम शिरतोडे यांनी लिहिले आहे. ते कृष्णाकाठ फाऊंडेशन सांगली या संस्थेने सादर केले. नाटकाच्या सुरुवातीला एका बगीच्यामध्ये मित्र आपल्या दुसऱ्या मित्राच्या प्रेम कहाणीबाबत विचारपूस करीत आहे. या दोघांच्या संवादातून फ्लॅशबॅक पद्धतीने सुमारे 30 पेक्षाही जास्त प्रसंग दर्शवीत त्याची नाट्यमय प्रेम कहाणी रंगमंचावर दृश्यमान होते. साक्षी गिड्डे, सुजय कुलकर्णी, गोमटेश अंकलखोपे, शाहिस्ता मकानदार, विक्रम शिरतोडे यांनी अभिनय केले. नेपथ्य निखिल वैरागकर. वेशभूषा, रंगभूषा निशा बंडगर व शाहिस्ता मकानदार यांनी केली.
राजेंद्र पोळ लिखित ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ हे नाटक सादर झाले. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एखादा सामाजिक प्रश्न उभा करणारे नाटक असेल, असा अंदाज होता आणि तो बराचसा खरा ठरला. हे नाटक एका आगळ्या प्रेम कथेभोवती गुंफले असून तिची अखेर ‘ऑनर किलिंग’ या सामाजिक समस्येने होते. यातील उत्तम बनकर याने भूमिकेचा सुयोग्य तोल राखीत भूमिका चांगली वठवली आहे. प्रणोती ढवळे तिनेदेखील चमक दाखविली. अन्य सहाय्यक भूमिकांमध्ये अक्षय वाघमारे, गीतांजली देसाई, प्रसाद काशीद, सलीम हिप्पर्गीकर यांनीही त्यांना चांगली साथ दिली. सुटसुटीत आणि यथोचित असे नेपथ्य डॉ. नवनाथ कोळी, प्रसाद काशीद यांनी दिले. प्रकाश योजना सूरज आनंद यांनी, तर पार्श्वसंगीत प्रसन्न काळे यांचे होते. रंगभूषा, वेशभूषा राजश्री ढवळे, रेवती ढवळे, श्रीकांत घेवारी यांची होती.