मिरज : मिरजेत पंधरा वर्षे वयाच्या शाळकरी मुलास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकारणी 11 जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दहावीत शिकणार्या दत्त कॉलनी, सुभाषनगर रोड, मिरज येथील विद्यार्थ्यास अमित जगदाळे यांनी दि. 8 रोजी रात्री ऑक्सिजन पार्क येथे बोलवून घेतले. त्यास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची तक्रार आहे.
अमित जगदाळे याने लाकडी बॅटने, अमोल जगदाळे याने लोखंडी पाईपने, सुप्रिया जगदाळे हिने काठीने, ऋषिकेश जाधव याने स्टम्पने संबंधित विद्यार्थ्याच्या दोन्ही हातावर, पायावर, पाठीवर व डोक्यात मारून जखमी केले. त्यांच्या इतर साथीदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
त्याच्या फिर्यादीनुसार अमित जगदाळे, सुप्रिया जगदाळे, अमोल जगदाळे, ऋषीकेश जाधव, अनिकेत शिंदे, श्रीधर जाधव, अशुतोष जगदाळे, अनिरुध्द जगदाळे, राजेंद्र जगदाळे, रघुनंदन जगदाळे, रूपा जगदाळे (सर्व रा. ऑक्सिजन पार्क, सांगलीकर मळा, मिरज) यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.