मिरजेत उत्साहाला उधाण 
सांगली

Ganesh Chaturthi : मिरजेत उत्साहाला उधाण

ढोल-ताशांचा निनाद; सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे आगमन

पुढारी वृत्तसेवा

मिरज : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मिरज शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणुका काढत उत्साहाला उधाण आणले. ढोल-ताशे, हलगी, बँड आणि विविध वाद्यांच्या गजराने शहरातील प्रमुख रस्ते दुमदुमून गेले. गणेशभक्तांनी मिरवणुकांमध्ये सहभाग घेत गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा केला.

मिरज मार्केट परिसरात तर मिरवणुकांची विशेष रंगत पाहायला मिळाली. विविध मंडळांच्या वाद्यपथकांनी सादर केलेल्या तालबद्ध वादनामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः निनादून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरावर तरुणाईसह गणेशभक्तांनी ठेका धरला. ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी केली होती. गणेश मंडळांनी आकर्षक सजावट केलेली वाहने, गणेशमूर्ती आणि वाद्यपथकांसह मिरवणुका काढल्या. काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते, तरुणाईचा उत्साह आणि गणरायाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाऽऽ’च्या जयघोषाने शहराचा परिसर दुमदुमत होता. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मिरज शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आज, सोमवारी होणाऱ्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सार्वजनिक मंडळांचे तसेच घरगुती गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT