मिरज : शहरात कोयत्याचा धाक दाखवून सराईत सौरभ पोतदार टोळीने एका कॅफे चालकाची लुटमार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोयत्याचा धाक दाखवून पोतदार टोळीने 2 हजार 900 रुपयांची लूट केली. याप्रकरणी चिदंबर सुनील शिंदे यांनी चौघांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सौरभ पोतदार, ओंकार साळुंखे, अक्षय फोंडे आणि सार्थक जाधव (सर्व रा. मिरज) यांचा आहे. यापैकी आकाश फोंडे आणि ओंकार साळुंखे या दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी चिदंबर शिंदे यांचा छत्रपती शिवाजी चौक येथे ब्रदर्स अड्डा नावाचा कॅफे आहे. या कॅफेमध्ये सौरभ पोतदार टोळी गुरुवारी रात्री 10 वाजता कोयता घेऊन दहशत माजविली. यावेळी चिदंबर शिंदे यांच्याकडे दिवसभर व्यवसायातून गोळा झालेल्या रकमेची मागणी केली. रक्कम देण्यास नकार दिल्याने चिदंबर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन गल्ल्यातील 2 हजार 900 रुपये रोकड काढून घेतली. यानंतर हातात कोयता घेऊन दहशत माजवत सर्वजण पसार झाले. ही घटना समजताच मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील यांना सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने आकाश आणि ओंकार या दोघांना अटक केली, तर सराईत गुन्हेगार सौरभ पोतदार आणि सार्थक जाधव हे दोघे मात्र पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.