जालिंदर हुलवान
मिरज : सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिरजेच्या प्रभागांमधून सुमारे 50 हून अधिक महिला उमेदवार लढणार आहेत. निवडणूक संपल्यावर मिरजेत प्रत्यक्षात पुरुषांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या देखील जास्त दिसणार आहे. तसेच मिरजेत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार देखील जास्त आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत मिरज शहरातून एकूण सात प्रभागांमधून 24 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या प्रभागांमध्ये बारा ठिकाणी महिलांंसाठी आरक्षण आहे. यामध्ये खुला गट, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती अशा वर्गातून महिलांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे या आरक्षित जागांवर तर महिला निवडून येतीलच, शिवाय अन्य 12 जागांवर देखील महिला निवडणूक लढू शकतात. त्यामुळे या 12 जागांवर देखील अनेक ठिकाणी महिला निवडणूक लढविणार आहेत.
सध्या केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे गट शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष, रामदास आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा सर्व पक्षांची महायुती आहे. मात्र या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष विभक्त लढणार आहेत. या सर्व पक्षांकडून महिला उमेदवार दिले आहेत. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या ही अधिक दिसणार आहे.
मिरजेतील सर्व प्रभागांमधून सुमारे 50 हून अधिक महिला या निवडणूक लढविणार आहेत. या महिला उमेदवार सध्या प्रभागांमध्ये पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरून प्रचार करू लागल्या आहेत. मिरजेतून 2018 मधील निवडणुकीमध्ये 24 पैकी 13 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. 11 पुरुष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्या निवडणुकीत देखील महिला नगरसेविकांची संख्या जास्त होती. शिवाय 2018 मध्ये महापौर देखील महिला झाली होती. आता या निवडणुकीत देखील पुरुषांपेक्षा नगरसेवकांची संख्या जास्त दिसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी मिळावी, या उद्देशाने शासनाने 50 टक्के आरक्षण दिले. शासनाचा तो उद्देश आता सफल होताना दिसत आहे.
मिरजेतील सहा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे. या सहा प्रभागांमध्ये (मतदार संघांमध्ये) पुरुषांची संख्या ही 66 हजार 872 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ही 70 हजार 386 आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 3 हजार 514 ने जास्त आहे.