Municipal corporation elections: निवडणुकीसाठी पुन्हा मिरज पॅटर्न? Pudhari Photo
सांगली

Municipal corporation elections: निवडणुकीसाठी पुन्हा मिरज पॅटर्न?

भाजप, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, जनसुराज्यमधील नगरसेवक अजित पवार गटात

पुढारी वृत्तसेवा

मिरज : महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिरज पॅटर्नचा पुन्हा प्रयोग होण्याची शक्यता मंगळवारी ठळक झाली. भाजप, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षातील माजी नगरसेवकांसह 12 जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात सोमवारी रात्री भेट घेतली. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यांचा दि. 19 रोजी पक्षप्रवेश होणार असल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत धक्कातंत्र वापरत पुन्हा मिरज पॅटर्न करणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणुकांचे बिगुल वाजताच घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांची महापालिका असलेल्या महापालिकेत मिरजेसाठी 27 जागा आहेत. या जागांसाठी मिरजेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे यांच्यासोबत इच्छुक नेत्यांनीही भेट घेतली. यावेळी माजी महापौर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर जामदार, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, माजी महापौर असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर, जनसुराज्य पक्षाचे आनंदा देवमाने आणि संतोष कोळी यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे, तर आधीपासूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या माजी नगरसेविका नर्गिस सय्यद याही उपस्थित होत्या.

इद्रिस नायकवडी हे आमदार झाल्यापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर वरील सर्व नेते व माजी नगरसेवक अजित पवार यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 19 रोजी मिरज दौऱ्यावर येत आहेत. यावेळी वरील नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT