सांगली

Jaykumar Gore: मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; नव्या वास्तूचे दुसऱ्यांदा उद्‌घाटन

पुढारी वृत्तसेवा

मिरज : आता मिरज पंचायत समितीचा पुढचा सभापती हा भाजपचाच असेल, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी व्यक्त केला. मिरज पंचायत समितीच्या नव्या वास्तूचे उद्‌घाटन गोरे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

शनिवारी अचानकपणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांकडून या वास्तूचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्यानंतर याच इमारतीचा रविवारी दुसऱ्यांदा भाजपच्यावतीने अधिकृत उद्‌घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मिरज पंचायत समितीमध्ये मी पूर्वी एक कार्यकर्ता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून आलोय याचा मला आनंद आहे. शनिवारी इतरांनी केलेले उद्‌घाटन मी कधीच मान्य करणार नाही. कधीकधी वाजंत्रीसुद्धा नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण त्यांचे काम नवरदेवाला स्टेजपर्यंत पोहोचवण्याचे असते. खासदार विशाल पाटील यांनी खासदार झाल्यापासून बाहेरून आणलेला एक रुपयाचा तरी निधी दाखवावा. सत्ता गेल्यामुळे आता त्यांना हाल भोगावे लागतील. आम्ही नीतिमत्ता सोडून कधीही राजकारण करणार नाही. आता यापुढे या पंचायत समितीत भाजपचाच सभापती दिसेल.

गोरे पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्याला आतापर्यंत ४२ हजार घरे मंजूर झाली आहेत. मिरज पंचायत समितीच्या जोड इमारतीसाठी पुन्हा ७ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. वसंतदादांचे नाव असलेल्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून त्यांचे नाव पुन्हा देण्यासाठी आवश्यक तो निधी देऊ.

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, मिरजेतील सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नाव दिले आहे. यापूर्वी पैसे सरकारचे आणि नावे स्वतःच्या नातेवाइकांची दिली जात होती. पारंपरिक राजकारण म्हणजे आपली जहागीरदारी वाटणाऱ्यांना शह देत गावगाड्याचे राजकारण करण्यात आले आहे. नाव विशाल असून चालत नाही, तर मन विशाल असावे लागते.

आमदार सुरेश खाडे यांना उद्देशून खोत म्हणाले की, खाडेभाऊ, तुमच्या नशिबाला यंदा ‘हा’ माणूस आला आहे, पण ‘ते’ आमच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. आमदार सुरेश खाडे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून नदीचे वाहून जाणारे पाणी जतसारख्या पूर्व भागाला दिले गेले आहे. प्रोटोकॉल न पाळता आधी उद्‌घाटन करणाऱ्यांवर ग्रामविकास मंत्र्यांनी कारवाई करावी. जुन्या बिल्डिंगला वसंतदादांचे नाव दिले आहे. इथून पुढे त्यांना स्वतःच्या पैशातून विकास करावा लागेल.

यावेळी भाजप नेते पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक दयानंद खोत, गणेश माळी, संदीप आवटी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT