Miraj ZP Election Results 
सांगली

Miraj ZP Election Results : मिरज : भाजप पुढं... काँग्रेस मागं

भाजपला जि. प.मध्ये 6, तर पं. स.ला 10 जागा; काँग्रेस : 7 वरून 3 वर : शिवसेनेने खाते उघडले

पुढारी वृत्तसेवा

मिरज : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अन्य पक्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेला भाजपचे 6, तर मिरज पंचायत समितीमध्ये 10 सदस्य निवडून आले आहेत. पंचायत समितीमध्ये काँग्रेसची संख्या मात्र सातवरून कमी होऊन ती तीनवर आली आहे. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाल्याने त्यांनी यंदा पंचायत समितीमध्ये खाते उघडले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला तीन, तर शरद पवार पक्षाला चार जागा मिळाल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली काल येथील वैरण बाजार येथे असणाऱ्या शासकीय गोदामामध्ये मतमोजणी पार पडली. जसजशी उमेदवारांची आघाडी समजत होती, तसतसे मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष होत होता.

कसबे डिग्रजमध्ये फेरमतमोजणी...

कसबे डिग्रज गणातून विनायक जाधव हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या सुधीर देशमुख यांनी मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी फेरमतमोजणीचा निर्णय घेतला. ही फेरमतमोजणी झाली, मात्र यामध्ये कोणताही बदल न झाल्याने विनायक जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले.

पक्षीय बलाबल...

मिरज पंचायत समितीमध्ये भाजपचे 10, काँग्रेसचे 3, शरद पवार राष्ट्रवादीचे 4, अजित पवार राष्ट्रवादीचे 3, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 2 सदस्य निवडून आले. जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला 6, काँग्रेसला 2, शरद पवार राष्ट्रवादीला 2, तर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा मिळाली.

नव्यांना संधी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यातून सर्व नव्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. मिरज पंचायत समितीचे माजी सभापती व समडोळीतील सदस्य अशोक मोहिते यांच्या पत्नी शोभा मोहिते यंदा देखील समडोळी मतदार संघातून निवडून आल्या आहेत.

सर्वात लहान उमेदवार विजयी...

नरवाड पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या तनवी कमलेकर या सर्वात कमी वयाच्या उमेदवार निवडून आल्या आहेत. त्यांचे वय 21 वर्षे एक महिना इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT