Social boycott case : नरवाडमध्ये कुटुंबावर सामाजिक बहिष्कार Pudhari
सांगली

Social boycott case : नरवाडमध्ये कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

नरवाड (ता. मिरज) येथे नंदीवाले समाजातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालून पाच लाख रुपयांचा दंड मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला

पुढारी वृत्तसेवा

मिरज : नरवाड (ता. मिरज) येथे नंदीवाले समाजातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालून पाच लाख रुपयांचा दंड मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबातील उत्तम पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.

पाटील आणि त्यांची पत्नी नंदा हे कुटुंबासमवेत नरवाड येथे वास्तव्यास आहेत. याचठिकाणी एका महिलेचा पतीकडून छळ होत असल्याने ती माहेरी राहण्यासाठी आली होती. तिला न्याय मिळावा, यासाठी उत्तम पाटील यांनी प्रयत्न केले. नेमकी हीच बाब नंदीवाले जातपंचायतीस खटकली. दोन महिन्यांपासून वारंवार त्यांना त्रास देण्यात आला. पंधरा दिवसापासून त्यांना समाजातून बहिष्कृत केले आहे. तसेच समाजविरोधी कृत्य केल्याच्या कारणातून त्यांना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे.

उत्तम पाटील आणि नंदा पाटील हे दाम्पत्य रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दोघेही घरातून बाहेर पडल्यानंतर शेजारी राहणारे समाजातील इतर लोक आपापल्या घरात निघून जातात, तसेच या दाम्पत्यासोबत कोणीही बोलत नाही, त्यांचा नंबर ब्लॉक केला आहे, असे उत्तम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच समाजमंदिरात येण्यासही बंदी घालण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT