जालिंदर हुलवान
मिरज : महापालिकेने मोठ्या दिमाखात मार्केट परिसरातील बांगड्यांच्या स्टॉलचे अतिक्रमण काढून टाकले, पण त्या जागेवर आता भेळ आणि आईस्क्रिमच्या व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. केवळ एकाच दिवसानंतर बंद पडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे.
चार दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने मोठा पोलिस फौजफाटा घेऊन मार्केट परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. ही मोहीम अशीच कायम पुढे चालेल, असे स्वत: आयुक्त सत्यम गांधी यांनी जाहीर केले होते. मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम केवळ एकच दिवस चालली. ही मोहीम अशीच कायम पुढे ठेवून मिरजेतील सर्व अतिक्रमणांवर हातोडा बसेल अशी अपेक्षा होती. मात्र नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. ज्याठिकाणचे अतिक्रमण काढले आहे, तेथे अद्यापही सिमेंटचे भाग पडलेले आहेत. रस्ता चकाचक करण्यात आलेला नाही.
येथील टाऊन हॉलसमोरील बांगड्यांचे स्टॉल व अन्य अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र अतिक्रमण ज्या दिवशी हटविण्यात आले, त्याचदिवशी तेथे इतरांनी अतिक्रमण केले आहे. आता त्या जागेवर भेळ, पाणीपुरी, आईस्क्रिमचा व्यवसाय सुरू झाला आहे. बांगडी व अन्य व्यवसाय बंद करून भेळ, पाणीपुरी व आईस्क्रिम व्यवसायासाठी हे अतिक्रमण काढले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सराफ कट्टा परिसरातील काही दुकानदारांचेच अतिक्रमण काढण्यात आले. अन्य काहींचे अतिक्रमण तसेच राहिले. त्यामुळे एकावर अन्याय आणि दुसऱ्याला मोकळीक दिली जात असल्याचा आरोप येथील काही व्यापाऱ्यांनी केला आहे.
जुन्या अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून ते दत्त चौकाकडे जाणारा रस्ता, मार्केटकडून सराफ कट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक दुकानांच्या पायऱ्या, कट्टे काढण्यात आले. पण काहींनी तेथे आता लोखंडी पायऱ्या बसविण्यास सुरुवात केली आहे. लोखंडी पायऱ्या बसवायच्या होत्या, तर सिमेंटच्या पायऱ्या का काढल्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे.