सांगली

Miraj News: भ्रष्ट ग्रामसेवकांकडून अधिकाऱ्यांना हप्ते

मिरजेतील मासिक सभेत सदस्यांचा आरोप : प्रशासकीय काळातदेखील मोठा भ्रष्टाचार

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत सदस्यांनी ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. काही भ्रष्ट व कामचुकार ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठी पाकिटे व हप्ते देतात; त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा गंभीर आरोप सदस्यांनी केला. तसेच गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांकडून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मिरज पंचायत समितीच्या धर्मवीर संभाजी महाराज सभागृहात शनिवारी मासिक सर्वसाधारण सभा पार पडली. अनेक गावांत दलित वस्ती सुधार कामात अनेक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. ग्रामसेवक तर गावात कधीही उपस्थित नसतात. त्यामुळे ग्रामसेवकांची बैठक लावावी आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक पद्धत बसवण्यात यावी, अशी मागणी सदस्य विनायक जाधव यांनी केली.

ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांचे म्हणणे ग्रामसेवक ऐकत नाहीत, गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि विचारणा केल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात काम असल्याचे कारण सांगून जबाबदारी टाळत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ग्रामसेवक तातडीने बैठक बोलावून त्यांना शिस्त लावावी, अन्यथा यापुढे एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा सदस्यांनी सभागृहात दिला.

यावेळी सदस्य राजेंद्र माळी म्हणाले, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, या आरोपामुळे सभागृहात खळबळ उडाली. वेळेत परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा माळी व अन्य सदस्यांनी दिला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणीही सदस्यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT