मिरज : सांगली जिल्ह्यातील ऊसदर आंदोलन रविवार, दि. २५ ऑक्टोबरला मध्यरात्री आणखी पेटले. साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला. उसाने भरलेल्या दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर जळून खाक झाला. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे ही घटना घडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटविल्याचा आरोप आहे. यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलींचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद पार पडल्यापासून स्वाभिमानीने ऊसदरासाठी आंदोलन सुरू केले आहे. आता आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. ऊसदराच्या प्रश्नाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन चिघळण्याची आणि हिंसक घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ऊसदराची कोंडी फुटलेली नसताना काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील भोसे येथे राष्ट्रीय महामार्गावर दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी वाहनेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखली होती. परंतु, पोलिस बंदोबस्तात ती सोमवारी हटविण्यात आली. आरग येथील कारखान्याकडे मल्लेवाडी येथून काही वाहनांतून ऊस वाहतूक केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर उसासह ट्रॅक्टर व ट्रॉली पेटवून दिली.