मिरज : मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलावात बुधवारी सुमारे दीड टन मासे मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, तलावातील पाण्याच्या प्रदूषणाचा आणि ऑक्सिजनच्या पातळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या तलावात मासे मृत्युमुखी पडून ते वर तरंगत होते. नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत बुधवारी माहिती दिली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व मासे बाहेर काढले. माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पाण्याची तपासणी आणि संबंधित यंत्रणांचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
गणेश तलावाला मिरजेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांपासून गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनासाठी या तलावाचा वापर केला जातो. मात्र, मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन झाल्यानंतर तलावाच्या पाण्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम आता समोर येत आहेत. दीड टन माशांचा मृत्यू ही केवळ जलचरांच्या हानीची घटना नसून, तलावाच्या पर्यावरणीय आरोग्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करणारी बाब आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि संबंधित पर्यावरण विभागाने तलावातील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच मृत माशांची योग्य विल्हेवाट लावून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.