मिरज : प्रयागराज येथे महाकुंभ सोहळा पार पडणार आहे. या धर्तीवर मिरज ते जयनगर विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मिरज ते जयनगर रेल्वे प्रयागराजमार्गे धावणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून प्रयागराजसाठी जाणार्या प्रवाशांची सोय होणार आहे.
मिरज ते जयनगर विशेष रेल्वे प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी मिरजेतून सुटेल. दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ती पुण्यात पोहोचेल. रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे पोहोचेल, तर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ही विशेष रेल्वे जयनगर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष रेल्वे जयनगर येथून प्रत्येक मंगळवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ही रेल्वे दुसर्या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी प्रयागराज चौकी येथे येईल, तर मिरज येथे रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. या विशेष रेल्वे गाडीला पुणे, मनमाड, प्रयागराज चौकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पटना, मोकामा, बरोणी, समस्तीपूर, दरभंगा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
मिरज ते जयनगर नवीन रेल्वे सुरू झाल्याने या गाडीने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सुकुमार पाटील, सुभाष मिश्रा, गजेंद्र कुल्लोळी, ज्ञानेश्वर पोतदार, राजेश कुकरेजा, नितीन आवटी यांनी केले आहे.