मिरजेत ‘पदवीधर’, ‘शिक्षक’ मतदारसंघासाठी चुरस  
सांगली

Graduate & Teachers Constituency Election|मिरजेत ‘पदवीधर’, ‘शिक्षक’ मतदारसंघासाठी चुरस

मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

मिरज : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मिरज शहर व परिसरात अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. गेल्या वेळेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिरजेत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे.

शहर व तालुक्यातील केंद्रनिहाय मतदान पुढीलप्रमाणे पार पडले. मिरज हायस्कूल येथील पदवीधरच्या दोन बूथवर १,२२० पैकी ७७३ मतदारांनी हक्क बजावला, तर शिक्षक मतदारसंघासाठी एक बूथ होता. डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात ६५५ पैकी ३७५, जुबली कन्या शाळेत ६५४ पैकी ४२५, तर आदर्श शिक्षण मंदिर येथील केंद्रावर ४८९ पैकी ३०९ मतदारांनी मतदान केले.

निवडणुकीत भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचार आणि मतदानासाठी आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे नेते इद्रीस नाईकवडी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी जोर लावला होता. तर महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यासाठी खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नियोजन केले होते.

कुपवाडमध्ये ‘पदवीधर’साठी ५८.६७ टक्के मतदान

कुपवाड : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येथील कुपवाड शहर मतदान केंद्र क्रमांक ५०६ वर शांततेत मतदान पार पडले. या केंद्रावर एकूण १९७ मतदारांची नोंदणी होती. मात्र, त्यापैकी ११ दुबार मतदारांची नावे वगळता निव्वळ मतदान १८६ होते. यामध्ये ८० पुरुष आणि ३५ महिला अशा एकूण ११५ मतदारांनी (५८.६७ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून ते सायंकाळी वेळ संपेपर्यंत मंदगतीने व तुरळक स्वरूपात मतदान सुरू होते.

दिवसभरात या मतदान केंद्रावरील प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण परिसरातील मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT