मिरजेत विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त 
सांगली

Ganesh Visarjan : मिरजेत विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त

१०४ अधिकारी, ७४७ पोलिस, २३५ होमगार्डची नियुक्ती; मिरवणुकीत मास्क घालून आल्यास थेट कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज शहरात आज पार पडणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली १०४ अधिकारी, ७४७ पोलिस कर्मचारी आणि २३५ होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सर्जिकल मास्क सोडून इतर कोणत्याही चेहऱ्यावरील मास्कला बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बंदोबस्ताचा आढावा बालगंधर्व नाट्यगृहात पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घेतला.

विसर्जन मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण मार्गाची विभागवार (सेक्शनवाईज) विभागणी करून उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराणा प्रताप चौक ते गणेश तलाव या मुख्य विसर्जन मार्गावर गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी एकामागे एकच मंडळ सोडले जाणार आहे. लक्ष्मी मार्केट बाजूने येणाऱ्या दोन मंडळांमागे दत्त मैदान चौकाकडून येणारे एक मंडळ सोडण्याचे नियोजन केले आहे.

मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरारी पथके आणि साध्या वेशातील पोलिस तैनात असतील. भाविकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा आणि आवाजाच्या दणदणाटातून विश्रांती मिळावी, यासाठी दर तासाला सात मिनिटांचा ब्रेक दिला जाणार आहे. मिरवणूक रेंगाळू नये म्हणून प्रत्येक मंडळासोबत एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर सोडून पलायन केल्यास तो जप्त करून दुसरा ट्रॅक्टर जोडून मिरवणूक पुढे नेली जाईल, असे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले.

असा असेल बंदोबस्त...

पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वात ५ पोलिस उपअधीक्षक, १९ पोलिस निरीक्षक, ७८ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ५८२ पोलिस कर्मचारी, ७५ वाहतूक पोलिस, २३५ होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी (३० कर्मचारी) आणि दंगल नियंत्रण पथकाच्या सहा तुकड्या (प्रत्येकी १० कर्मचारी) तैनात करण्यात आल्या आहेत.

विसर्जन मार्गावर वाहनांना बंदी

स्टेशन चौक ते लक्ष्मी मार्केट, हिरा हॉटेल चौक ते लक्ष्मी मार्केट, नदीवेस ते लक्ष्मी मार्केट, गाढवे चौक ते लक्ष्मी मार्केट आणि लक्ष्मी मार्केट ते गणेश तलाव या मार्गांवर जड वाहतुकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

सात ध्वनी मापक यंत्रे सज्ज

मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी सात ध्वनी मापक यंत्रांसह विशेष पथके तैनात असतील. याशिवाय लेसर बीम व प्लाझ्मा लाईटच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, नियम मोडणाऱ्या मंडळांवर थेट गुन्हे दाखल केले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT