मिरज : शहरातील सराईत गुन्हेगार इशरत बारगीर याच्या दहशतीला वैतागलेल्या तरुणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून बेदम मारहाण केली. यानंतर त्याची शहरातून धिंडही काढली. दरम्यान, अवैध धंद्यांच्या वसुलीतून इशरत बारगीर याच्यावर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इशरत बारगीर हा मिरजेतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे यापूर्वी त्याच्यावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईही झाली होती.
इशरत बारगीर याची मिरजेत दहशत वाढली होती. त्याने मिरजेतील काही अवैध धंदे चालकांकडे वसुलीचा तगादा लावला होता. यातून त्याचा यापूर्वी अनेकांशी वाददेखील झाला होता. याच कारणातून शुक्रवारी दुपारी त्याच्या दहशतीला वैतागलेल्या तरुणांनी माळी गल्ली परिसरात त्याच्यावर हल्ला केला. 15 ते 20 तरुणांनी बारगीरला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जमावातील एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. पाठीत कोयत्याचा वर्मी घाव बसल्याने बारगीर गंभीर जखमी झाला. त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी संतप्त तरुणांनी त्याला सर्वांची माफी मागायला लावून परिसरातून धिंड काढली. या घटनेची मिरज शहर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.
नगरसेवकालाही धमकी
इशरत बारगीर याने प्रभागातील काम करण्यासाठी एका काँग्रेसच्या नगरसेवकास फोनवरून धमकी दिली होती. तसेच आपली दहशत निर्माण करण्यासाठी नगरसेवकाला दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग करून समाजमाध्यमांवर व्हायरल केले होते.