मिरज : मिरजेत गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मोटार मागे घेताना ‘बाजूला व्हा’, असे म्हटल्याने दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एक तरुण जखमी झाला. यावेळी दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. याप्रकरणी दोन्ही गटातील 14 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मंगळवारी रात्री आसिफ तहसीलदार हा मोटार मागे घेत होता. यावेळी तेथे थांबलेल्या संदीप शिंदे व त्याच्या साथीदारांना त्याने ‘बाजूला व्हा’ असे म्हटल्याच्या कारणावरून वादावादी व हाणामारी झाली. आसिफ यास मारहाणीमुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांचे समर्थक एकत्रित झाले. मोटारचालक असिफ तहसीलदार यास मारहाण झाल्याने आसिफ व त्याचे साथीदार श्रेयस याच्या घरात घुसले. तेथे श्रेयस याच्या आईला धक्काबुक्की व अन्य उपस्थित महिलांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पिटाळून लावले. दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यासमोरही मोठी गर्दी जमली होती. याबाबत शोएब बद्रेमुनीर तहसीलदार यांनी संदीप शिंदे, नायकवडी, पवार, पवारचा मित्र कदम व इतर चार ते पाच जणांनी मोटार मागे घेताना ‘बाजूला व्हा’ असे म्हटल्याच्या कारणावरून भाऊ आसिफ तहसीलदार यास लोखंडी गजाने डाव्या पायावर मारून जखमी केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप शिंदे, पवार व नायकवडी या तिघांना अटक केली आहे.