मिरजेत आज भव्य मिरवणुका  
सांगली

Ganesh Visarjan : मिरजेत आज भव्य मिरवणुका

२०३ गणेश मंडळांच्या श्री मर्तींचेे होणार विसर्जन

पुढारी वृत्तसेवा

मिरज : गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त आज-शुक्रवारी अनंत चतुर्दशीला मिरज शहरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. शहरातील २०३ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे भव्य मिरवणुकीने विसर्जन करण्यात येणार असून, यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.

मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव आणि कृष्णाघाट येथील कृष्णा नदी या प्रमुख ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विविध मंडळांकडून आकर्षक रथ, सजावट, ढोल-ताशा पथके आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात १ हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही व पोलिसांची विशेष नजर असणार आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पाडावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

'डीजे'चा दणदणाट थांबणार का?

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिरज शहरातील गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल-ताशा, बँजो यांसारख्या पारंपरिक वाद्यांना पसंती देऊन आदर्श निर्माण केला होता. मात्र, सातव्या आणि नवव्या दिवशी काही मंडळांनी डीजेचा वापर केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत खटले दाखल केले आहेत. आता अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा निनाद होणार की पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकू येणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. डीजे वापरणाऱ्यांवर पोलिसांनी आधीच कारवाई केल्याने विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची भूमिका काय राहणार, याचीही उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT