मिरज : मिरज रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची पाकीटमारी करणाऱ्या व व्यावसायिकांकडून हप्ते वसुली करणाऱ्या सराईत गुंडास संतप्त लोकांनी बेदम चोप दिला. काठीने, पाईपने केलेल्या मारहाणीत सराईत गुंड हुसेन ऊर्फ गुठल्या हा रक्तबंबाळ झाला. तो रुग्णालयात दाखल आहे.
मिरज रेल्वे स्थानकाबाहेर अनेक सराईत गुंडांची वर्दळ आहे. काही सराईत गुंड पोलिसांचे खबरे असल्याचे सांगून लोकांना त्रास देतात. गुठल्या रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची पाकीटमारी करीत होता. तसेच रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही तो हप्ता वसुली करीत होता. काही दिवसांपूर्वी एका दुकानदाराने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्या दुकानात गोंधळ घालून व्यावसायिकास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने व्यापाऱ्यांकडून मारहाण होईल, या भीतीने बेळगावला पलायन केले होते.
तो सोमवारी बेळगावहून मिरजेत परतला होता. यानंतर दुपारी पुन्हा त्याने हप्ता वसुली सुरू केली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर चिडलेले लोक आणि व्यापाऱ्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण केल्यानंतरही त्याने धमकी दिली. त्यामुळे लोकांनी रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला मारहाण केली. गुंडांच्या दहशतीला वैतागलेले लोक आणि व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू होती.