मिरज : मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणार्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले. पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितासह चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 73 हजार रुपये किमतीच्या 928 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
अरबाज ऊर्फ इब्राहिम रेठरेकर (वय 21, रा. अमननगर, मिरज), अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख (वय 20, रा. मालगाव रस्ता, मिरज), उमरफराज राजू शेख (वय 32, रा. शनिवार पेठ, मिरज) आणि एक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरातील महात्मा गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर एका हॉटेलजवळ दोघे नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली. त्यानुसार शिंदे यांनी पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. पथकाने महात्मा गांधी चौक येथे सापळा लावला असता त्यांना दोघे संशयित चालत येताना दिसले.
त्यांच्या पाठोपाठ दोघेजण दुचाकीवरून येऊन त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या सुपूर्द केल्या. चौघांवर उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 73 हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.