मिरज : पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणार्या मिरजेतील गणेशोत्सव यंदा नशामुक्त आणि डीजेमुक्त साजरा होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात 35 मंडळांच्या अध्यक्ष सोबत पोलिसांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी मंडळाच्या अध्यक्षांना विविध सूचना दिल्या. तसेच नशामुक्त आणि डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
मिरजेतील गणेशोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे आणि त्यानंतर मिरजेत सर्वाधिक काळ गणेश विसर्जन मिरवणूक चालते. अत्यंत संवेदनक्षम असणार्या मिरज शहरात सुरळीतपणे गणेशोत्सव पार पाडणे पोलिसांसमोर एक आव्हान असते. त्यामुळे पोलिसांनी आतापासूनच मंडळांच्या अध्यक्षांची बैठका घेऊन गणेश उत्सव सुरळीत पार पाडण्याबाबतच्या उपाय योजनांना सुरुवात केली आहे.मिरज शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक किरण रासकर, शहरातील 35 गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि 20 ज्येष्ठ नागरिक यांची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध सूचना मांडण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी यंदाचा गणेशोत्सव नशामुक्तआणि डीजे मुक्त साजरा करावा असे सांगितले. नशा मुक्तीसाठी प्रत्येक मंडळाने त्यांच्या गणेशोत्सव मंडळासमोर फलक लावावेत, गणेशोत्सव काळात कोणताही कार्यकर्त्याने नशा करून मंडळ जवळ येऊ नये याची खबरदारी अध्यक्षांनी घ्यावी, पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले.
गणेश उत्सव मिरवणुकीत आगमनावेळी किंवा विसर्जनावेळी कोणत्याही मंडळाने लेझर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे मंडळ लेझर लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेदेखील पोलिस निरीक्षक रासकर यांनी सांगितले.