सांगली : राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाने रविवारी सकाळी म्हैसाळ रोडवर छापा टाकून औषधाच्या नावाखाली नेण्यात येणारी गोवा बनावटीची 41 लाख 36 हजाराची देशी दारु जप्त केली. याप्रकरणी लभजित गुरमेज सिंह (वय 32 रा. पिलभित उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली असून, यातील कंटेनरही जप्त करण्यात आला आहे. ही दारु गोवाहून नागपूरला नेण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखालील मिरज विभागाच्या पथकाला बेकायदा देशी दारुची वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हैशाळ फाट्याजवळ मिरज येथे देशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणारा दहा चाकी कंटेनर (क्र. एमएच40. सीटी 2814) आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा महसुल चुकवुन आयात केलेली विविध प्रकारची देशी दारु सापडली. त्यामध्ये कोंकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा, गोवा नं. 1 संत्रा देशी दारु या विविध प्रकारची देशी दारु सापडली. याची किंमत 41 लाख 36 हजार आहे. या वाहनामध्ये तीन वाहनांचे दोन बनावट नंबर सापडले. यामध्ये विविध तीन प्रकारचे बनावट औषधांची बिले मिळून आली आहेत. त्यामध्ये मे. अरिस्टो फार्मास्युटिकल्स प्रा.लि. भोपाळ मध्य प्रदेश, मे. निकिता फार्मास्युटिकल्स स्पेशालिटिज् प्रा. लि. नागपूर व मे. रुसन फार्मा लिमिटेड अंकलेश्वर गुजरात या कंपन्यांच्या नावची बनावट औषधांची बिले सापडली आहे.
या गुन्ह्यामध्ये वाहनासह 71 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लभजित गुरमेज सिंह (रा. पिलभित, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली आहे. त्यांनी ही दारु गोवा राज्यातून नागपूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्याच्याकडे आणखीन अधिक तपास सुरु आहे.