सांगली

Excise department: उत्पादन शुल्क विभाग शुल्क वसुलीतच मग्न

भरारी पथकच भुर्र... भुर्र... : बनावट दारू, बनावट ताडी, हातभट्टीची विक्री थांबणार कधी?

पुढारी वृत्तसेवा
जालिंदर हुलवान

मिरज : बनावट दारूची (विषाची) विक्री होऊ नये, याची सर्वस्वी जबाबदारी असणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकच भुर्र... भुर्र... उडून गेले आहे. हा विभाग केवळ शुल्क वसुलीतच मग्न आहे.

दारू पिणाऱ्यांची संख्या जशी जास्त तसेच ताडी, गावठी हातभट्टी पिणाऱ्यांचीही. नशा येणारी ताडी झाडापासून बनविली जाते. जिल्ह्यासह राज्यात ताडीची मोजकीच झाडे असताना, लक्षणीय प्रमाणात ताडी तयारच कशी होते? भेसळीशिवाय हे शक्य आहे? ही ताडी विषच आहे. बनावट ताडी पिणाऱ्यांना दिव्यांगत्व येऊ शकते. ताडी, शिंदी ही दारूच. शिंदी नावाच्या झाडापासून ती तयार केली जाते. झाडाच्या वरच्या बाजूला कोयत्याने घाव करतात. घाव घातलेल्या बाजूला लोटके लावतात. त्यात या झाडाचा रस पडतो. रसापासून ही ताडी तयार केली जाते.

सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे होती. काही प्रमाणात जत, विटा, तासगाव, आटपाडी परिसरातही अशी झाडे आढळतात. नैसर्गिकरित्याच अशी झाडे उगवतात. या झाडांची मोजणी करून ज्या त्या भागामध्ये शासनाने ताडीची दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांचा लिलाव केला जातो. तयार झालेली ताडी २५ ते ३० रुपये (प्रति लिटर) प्रमाणे विकली जाते. ही ताडी अधिकृतपणे विकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागते. सांगली, मिरज, सलगरे, माधवनगर, विटा, जत, डफळापूर, करेवाडी, मुचंडी, किल्लेमच्छिंद्रगड, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, ईश्वरपूर या ठिकाणी ताडी विक्रीची दुकाने आहेत.

ताडीच्या झाडांपासून काढलेल्या ताडीमध्ये रसायनांच्या साहाय्याने तयार केलेली पावडर (मिथाईल अल्कोहोल, क्लोरल हायड्रेट व अन्य घातक पदार्थ) आणि पाणी टाकून मिसळले जाते. या पावडरीच्या साहाय्याने बनावट ताडी केली जाते.

बनावट ताडीच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कमाई केली जात आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील अनेकजण या व्यवसायात कार्यरत आहेत. काही परराज्यांतील आहेत. या बनावट ताडीच्या व्यवसायाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीच कारवाई का करीत नाही?

राज्यातील ५७ भरारी पथके काय करतात?

हातभट्टी दारू विक्रीतून अनेकजण गबर झालेत. आरोग्यास घातक असल्यामुळेच तर शासनाने बंदी घातली आहे. अशा हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री होऊ नये ही जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडे दिली आहे. या पथकाचे कार्यालय मुंबईत आहे. अंमलबजावणी व दक्षता विभागातून त्यांचे काम चालते. वास्तविक या विभागाकडे संपूर्ण राज्यभर कारवाई करण्यासाठी १ भरारी पथक, विभागीय स्तरावर ९ भरारी पथके आणि जिल्हास्तरावर ४७, अशी एकूण ५७ पथके आहेत. ही पथके नेमकी कोणती कारवाई करतात? हा संशोधनाचा विषय.

शिक्षेचे प्रमाण नगण्य

बनावट दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद आहे. मात्र अशांना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. परिणामी, आरोग्याशी खेळ जोमात आहे.

तक्रारी देण्याचे लोकांना आवाहन

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंमलबजावणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे म्हणाले, पुण्यातील घटनेमुळे आम्हाला प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नये असे सांगितले आहे. तरीही नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडे तक्रारी कराव्यात.

माणसे मेली तरीही...

मुंबईमध्ये सुमारे शंभरहून अधिक जणांचा सात वर्षांपूर्वी बळी गेला होता. आता तर पुण्यात २० हून अधिक जणांचा विषारी हातभट्टीची दारू पिल्याने मृत्यू झाला. कोठे आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT