मिरज : येथील मार्केट परिसरातील एका खोक्याचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना विरोध करीत खोकी मालकाने त्याच्या मुलाच्या अंगावर व खोक्यावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकारामुळे पथक कारवाई न करता घटनास्थळावरून निघून गेले.
शहरातील मार्केट परिसरामध्ये कपड्यांच्या 13 दुकानांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने दि. 21 नोव्हेंबररोजी काढले. बंदोबस्तात आयुक्तांनी ही कारवाई केली होती. येथील खोक्यांपैकी रंगीला नावाचे पानपट्टीचे एक खोके तेथेच राहिले होते. त्याला मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत देऊनही त्याने खोके हटवले नव्हते. शनिवारी रात्री अचानक महापालिकेचे पथक जेसीबीसह तेथे आले. हा प्रकार समजताच खोक्याचा मालक व त्याचा मुलगा दोघेही तेथे आले. त्यांनी अधिकाऱ्यांना मज्जाव केला.
अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच खोक्याच्या मालकाचा मुलगा खोक्यात गेला. त्यानंतर खोक्याच्या मालकाने मुलाच्या अंगावर आणि खोक्यावर पेट्रोल फेकले. काडेपेटी द्या, असा आरडाओरडा सुरू केला. काही जणांनी त्याला समजावून सांगितले. काही वेळाने कारवाई न करताच पथक निघून गेले. याबाबत सहायक आयुक्त अनिस मुल्ला म्हणाले, मुदत देऊनही त्यांनी खोके हटवले नसल्याने आज कारवाई करायची होती. मात्र, पुन्हा त्याला रविवारपर्यंत मुदत दिली आहे.