Miraj News 
सांगली

Miraj News : सहा वर्षांच्या चिमुकलीने गिळलेला धातूचा हुक दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढला

मिरज सिव्हिलच्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करत हुक काढून दिले चिमुकलीला जीवनदान

पुढारी वृत्तसेवा

मिरज : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) डॉक्टरांनी कौशल्याची प्रचिती देत सहा वर्षांच्या मुलीच्या अन्ननलिकेत अडकलेला धातूचा मोठा हुक यशस्वीरित्या बाहेर काढला. खासगी रुग्णालयाने शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आणि जीविताचा धोका सांगितला असताना, मिरज सिव्हिलच्या डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे कोणतीही शस्त्रक्रिया न करता हा हुक काढून चिमुकलीला जीवनदान दिले. त्यासाठी दोन तास लागले.

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या स्फूर्ती नावाच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने घरातील सजावटीच्या कुंडीला असलेला एस या आकाराचा धातूचा हुक खेळता-खेळता गिळला होता. हुकचा आकार मोठा असल्याने तो तिच्या अन्ननलिकेत अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊन छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या.

चिमुकलीला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी एक्स-रे तपासणी करून मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. तसेच, शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आणि जोखमीमुळे नातेवाईकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले.

स्थितीचे गांभीर्य ओळखून शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रुपेशकुमार शिंदे, निवासी डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि परिचारिकांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले. शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती, कारण हुक टोकदार होता. डॉक्टरांनी अत्यंत संयमाने कोणताही चीरा न लावता एंडोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर केला. अन्ननलिकेतून हा धातूचा हुक सुरक्षित बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT