मिरज : मिरजेतील मंगळवार पेठेत चर्चजवळ पूर्ववैमनस्यातून बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी सलून दुकानाची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मिरज पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांत गणेश तानाजी कलगुटगी, चेतन सुरेश कलगुटगी, सूरज कोरे व अन्य चार साथीदारांचा समावेश आहे. सर्वजण मिरजेचे रहिवासी आहेत. याप्रकरणी रोहन संजय कलगुटगी याने शहर पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडर गल्लीत गेल्या आठ दिवसांपासून जुना वाद धुमसत होता. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चर्चजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानात रोहन कलकुटगी (रा. वडर गल्ली, मिरज) आणि विकी कलगुटगी बसले होते. यावेळी संशयित गणेश कलगुटगीसह पाच ते सहा साथीदार तेथे आले. त्यांनी रोहन याला शिवीगाळ करीत काठ्याने हल्ला चढवला. यावेळी गणेशने गावठी पिस्तुलातून रोहनवर गोळी झाडली, मात्र रोहनने गोळी चुकवल्याने तो बचावला व गोळी रस्त्यावर आदळली.
यावेळी हल्लेखोरानी वैभव यादव यांच्या सलून दुकानातील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. रोहन व विकी यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केल्यानंतर सर्वांनी पलायन केले. गोळीबाराच्या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रणील गिल्डा, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, शहर निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रस्त्यावर पडलेले रिकामे काडतूस पोलिसांनी जप्त केले. याबाबत शहर पोलिसांत रोहन कलगुटगी याने गणेश कलगुटगी, चेतन कलगुटगी, सूरज कोरे व अन्य चार साथीदारांविरुद्ध गोळीबार व मारहाणीची तक्रार दिली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य संशयित गणेशचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेश कलगुटगी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल जप्त केले होते. याची खबर रोहन यानेच पोलिसांना दिल्याचा संशय त्याला होता. त्यातच रोहन हा एका तडीपार गुंडासोबत फिरत होता. गेल्या आठ दिवसांपासून हा वाद धुमसत होता. त्यातून गणेशने रोहनवर हल्ला केल्याची चर्चा घटनास्थळी होती.