Miraj Crime News 
सांगली

Miraj Crime : मिरजेत बदला घेण्यासाठी सज्ज कोयता गँग जेरबंद

खुनीहल्लाप्रकरणी मतीन काझीसह सहाजणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज येथे शिवप्रसाद अथणीकरवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काझी टोळीवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी कोयते आणि लोखंडी रॉडसह जेरबंद केले. दरम्यान, मिरजेत टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रसाद अथणीकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित मतीन काझीसह सहाजणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टाकळी रोड परिसरात शिवप्रसाद अथणीकर या तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला होता. महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या पथकाने मतीन काझी, शौकत शेख, आयन लांडगे, शोएब शेख, शाकिब खान यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या कोयता व तलवारहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवप्रसाद अथणीकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे.

अथणीकर यांच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काही युवक काझी टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांना मिळाली होती. त्यानुसार दि. ३ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता दिंडीवेस परिसरात पोलिसांनी सापळा रचून एका दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार कोयता आणि एम एच -०९- एफ एफ -८३८५ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.

त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. ४ जून रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता अमननगर परिसरात आणखी दोघांना कमरेला कोयता आणि लोखंडी रॉड बाळगून फिरताना पकडण्यात आले. या कारवाईत दोन धारदार कोयते, एक लोखंडी रॉड आणि दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोविंद सदाशिवराव नाईक (वय २६), रिहान तौफिक शिकलगार (वय ३०), राजू अजीज मुल्ला (वय २५) आणि अल्फाज अखिल मुल्ला (वय २४) यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT