मिरज : दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून कोयत्याने दहशत माजवून भरदिवसा दुकानाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार प्रथमेश तांदळे (वय 28, रा. कमानवेस, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तो राहात असलेल्या परिसरात पोलिसांनी त्याला फिरवले. त्याच्या घरी छापा टाकून कोयता जप्त केला.
शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे मनोज चव्हाण यांचे दुकान आहे. दोन वर्षापूर्वी प्रथमेश हा त्यांच्या दुकानात गॉगल घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने पाचशे रुपयांत दोन गॉगल देण्याची मागणी केली होती. परंतु त्याला दुकानदार मनोज यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली होती. दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून प्रथमेश हा बुधवारी सायंकाळी कोयता घेऊन मनोज चव्हाण यांच्या मनोज कलेक्शन या दुकानात गेला. त्याने सुरुवातील दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या रॅकवर हल्ला केला. त्यानंतर दुकानाच्या काचेवर कोयता मारून काच फोडली. तसेच मनोज चव्हाण यांना ‘येथे धंदा करायची नाही’, अशी धमकी देऊन पलायन केले. ही घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली होती. मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील याच्यासह पथकाने प्रथमेश तांदळे याला अटक केली.