मिरज : मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या स्वागत कमानीचे काम नव्याने सुरू आहे. या कामात मशिनने स्लॅब ओतत असताना अचानक तो कोसळला. त्यामुळे बिहार व पश्चिम बंगाल येथील सात कामगार जखमी झाले. पोलिस व नागरिकांच्या तत्परतेच्या मदतकार्यामुळे हे बांधकाम कामगार मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
सियाराम चौधरी (वय ३०, रा. बिहार), मिनारूल शेख (३१), कदर शेख (२२), अरविंद कुमार चौधरी (२६), अमितसुर मलिक (४५, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल), राखीपमुल शेख (२८), साहेब शेख (२४, दोघे रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.
मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये रुग्णालयाचे वॉल कंपाऊंड व स्वागत कमान बांधण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्वागत कमानीचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूला पिलर यापूर्वीच उभे केले आहेत. या पिलरच्या वरच्या बाजूचा स्लॅब मशिनच्या साहाय्याने ओतण्यात येणार होता. दुपारी मशिनच्या साहाय्याने या स्लॅबमध्ये खडी, सिमेंट, वाळू असा तयार काँक्रीटचा माल ओतला जात होता. हे काम सुरू असतानाच अचानकपणे हा स्लॅब कोसळला. या ठिकाणी काही कामगार काम करत होते. त्यापैकी एक कामगार मशिनच्या लोखंडी रॉडला धरून बसला, तर अन्य सात कामगार काँक्रीटच्या मालाखाली गाडले गेले.