Chandrakant Patil 
सांगली

Chandrakant Patil : ‘मिरज सिव्हिल’ला प्रा. शरद पाटील यांचे नाव देऊ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील; कुपवाड येथे १०० फुटी राष्ट्रीय ध्वज, स्मृती उद्यानाचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या विस्तारीकरणामध्ये माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात आहे. माजी आमदार पाटील यांच्यासारख्या चांगल्या माणसाचे नाव रुग्णालयाला देण्यास कोणतीही अडचण नाही. याबाबतचे कोणा-कोणाचे प्रस्ताव आहेत, हे पाहून आणि अडचणींवर मात करून प्रा. पाटील यांचे नाव मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलला निश्चितपणे देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कुपवाड येथे १०० फुटी राष्ट्रीय तिरंगा ध्वज व ‘मा. आ. प्रा. शरद पाटील स्मृती उद्याना’चे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, माजी आमदार प्रा. शरद पाटील हे साधे आणि सरळमार्गी होते. सामान्य माणसाच्या कामासाठी ते तासन्‌ तास शासनदरबारी ताटकळत बसलेले असायचे. सामान्यांचे काम करताना ‘मी माजी आमदार आहे,’ हे ते विसरून जायचे. त्यामुळे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासारखी संवेदनशील माणसे समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.

कुपवाड शहर हे नियोजन न करता वाढलेले शहर आहे. कुपवाडवासीयांनी शहराच्या विकासाचे आताच नियोजन करावे. नियोजन केले नाही तर हे शहर नावालाच महापालिकेत राहील. ग्रामीण भाग बरा, अशी स्थिती होईल. सध्या राज्याची स्थिती नाजूक असली तरी हळूहळू सुधारत आहे. राजकीय नेत्यांनी आपली कामे तयार ठेवावीत. या विकास कामांसाठी टप्प्या-टप्प्याने शासनाकडून निश्चितपणे निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी समाजसेवी हेतूने काम केले. कुपवाड शहराचा विकास करणे हीच प्रा. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल. महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचीही भाषणे झाली. स्वागत स्मारक समितीचे नेते नरसगोंडा पाटील यांनी केले. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या पत्नी रतन पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी भाजपचे पृथ्वीराज पाटील, सभागृह नेते संदीप आवटी, परिवहन समिती सभापती प्रकाश पाटील, प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापती माया गडदे, महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT